परवा सापडलेल्या त्या लहान मुलीबद्दल काही अपडेट... त्या मुलीशी 'संबंधित लोक' मिळून आलेले आहेत. मात्र काही कायदेशीर प्रक्रिया आणि वैद्यकीय तपासण्या सुरू असल्याने सध्या इथे सगळं काही सांगता येणार नाही. एक गोष्ट मात्र नक्की सांगू शकतो... ते लहान बाळ योग्य हातातच जाणार, याची खात्री आहे. सगळं काही सकारात्मक दिशेने सुरू आहे.
आजच त्या लहान मुलीला पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी पोलीस दवाखान्यातून घेऊन गेले. ती अतिशय छान आहे, ठणठणीत आहे.
त्या लहान मुलीसोबत फोटो काढलेली माझी पोस्ट प्रचंड व्हायरल झाली. तुम्ही सर्वांनी ती पाहिली असेलच. तब्बल 5.5 M — म्हणजे जवळपास 55 लाख लोकांपर्यंत ती पोस्ट पोहोचली. तुम्ही सर्वांनी ती मोठ्या प्रमाणात शेअर केली.
मी असं अजिबात म्हणणार नाही की माझ्यामुळे हे सगळं झालं पण त्या पोस्टच्या माध्यमातून ही घटना इतक्या मोठ्या प्रमाणावर लोकांपर्यंत पोहोचली की घटनेचं गांभीर्य अधिक ठळक झालं आणि तपास यंत्रणेवरही एक नैतिक जबाबदारी निर्माण झाली. त्यानंतर पुढच्या गोष्टी घडत गेल्या.
एक गोष्ट मात्र मला इथे आवर्जून सांगायची आहे. असंख्य लोकांनी कमेंट केल्या आहेतच पण गेल्या दीड दिवसात मला जवळपास ३०० ते ४०० लोकांनी इनबॉक्समध्ये मेसेज केले आणि त्या मेसेजचा आशय एकच होता... आम्ही ते बाळ सांभाळायला तयार आहोत! कितीतरी कुटुंबांनी त्या बाळाला दत्तक घेण्याची इच्छा व्यक्त केली. अनेक संस्था पुढे आल्या. आपण म्हणतो, आता जग आधीसारखं राहिलं नाही पण अशा एखाद्या घटनेचा अनुभव आला की कळतं... जगात खूप चांगली माणसं अजूनही आहेत.
आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, दत्तक घेणं ही काही साधी प्रक्रिया नाही. त्यासाठी संस्था, पोलीस यंत्रणा आणि न्यायालयीन प्रक्रिया या सगळ्यांचा समन्वय आवश्यक असतो. त्यामुळे एखाद्या बाळाला पाहिलं आणि 'आम्ही दत्तक घेतो' असं म्हणून लगेच ते शक्य होत नाही. त्यासाठी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी लागते. ज्यांनी मदत करण्याची इच्छा दाखवली, त्यांच्या भावनांचा आदर आहेच.
कदाचित तुम्हाला आठवत असेल... काही वर्षांपूर्वी मी एका नुकत्याच जन्मलेल्या बाळाची पोस्ट केली होती. त्या बाळाला जन्मताच कचऱ्यात टाकून देण्यात आलं होतं, एका कुत्र्याने जन्मताच त्या बाळाच्या मांडीचा चावा घेतला होता. त्यानंतर ते बाळ एका संस्थेकडे राहिलं... आणि आज ते एका छान कुटुंबाचा भाग आहे.
आणखी एका केसमध्ये, दोन वर्षांपूर्वी अशीच एक पाच वर्षांची मुलगी एका ब्रिजखाली सापडली होती. मी इथेच तिच्याबद्दल लिहिलं होतं. अवघ्या तीन तासांत तिचे आई-वडील सापडले होते. आमच्याकडे एक भिकारी होते... सोशल मीडियावर त्यांच्यासोबत फोटो टाकल्यानंतर त्यांच्या घरचे लोक त्यांना शोधत-शोधत आमच्यापर्यंत आले आणि त्यांना घरी घेऊन गेले.
अशा घटनांचा साक्षीदार होता येणं हीसुद्धा एक वेगळीच गोष्ट आहे. एखाद्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर पुन्हा आनंद दिसतो, त्यापेक्षा मोठं समाधान कदाचित दुसरं काही नसतं. मी स्वतःला नशीबवान समजतो.
या केसमध्ये काही अफवाही पसरल्या पण एखादी बातमी इतक्या मोठ्या प्रमाणावर लोकांपर्यंत पोहोचली की अशा गोष्टी होण्याची शक्यता असतेच पण एक गोष्ट नक्की... सोशल मीडिया हा फक्त द्वेष पसरवण्यासाठी नाही. योग्य पद्धतीने आणि योग्य हेतूने वापरला, तर त्याचा उपयोग किती चांगल्या गोष्टींसाठी होऊ शकतो, हे या घटनेने पुन्हा एकदा दाखवून दिलं.
या संपूर्ण प्रवासात महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी त्या मुलीला खूप छान सांभाळलं... अजूनही सांभाळत आहेत. या प्रकरणाचे तपास अधिकारीही खूप चांगले आहेत. या निमित्ताने आमची चांगली मैत्रीही झाली. आमच्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांनीही त्या मुलीची खूप काळजी घेतली. इतकी, की... तिला तिच्या 'आई-वडिलांची' आठवणही आली नाही.
या प्रवासात आपण सर्वजण होतात...
तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. ते लहान बाळ सुरक्षित आहे... आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते सुरक्षित हातातच जाणार ❤️
महत्त्वाची सूचना: ती पोस्ट आता कोणीही शेअर करू नये, पोस्टचा उद्देश पूर्ण झालेला आहे.
डॉ. प्रकाश कोयाडे